Breaking News
Home / ठळक बातम्या / ‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री ?

‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री ?

पिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

समितीने सुचवलेले बदल अंमलात आणल्यानंतरच सेन्सॉरतर्फे या चित्रपटाला प्रमाणित करणार येणार असल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. चित्रपटाच्या नावातील बदलासोबतच आणखी काही बदलही सुचवण्यात आले असल्याचे कळत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवण्यात येणाऱ्या ‘डिस्क्लेमर’मध्ये हा चित्रपट ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून तो काल्पनिक चित्रपट असल्याचेही स्पष्ट करावे, अशी सूचना सेन्सॉरकडून करण्यात आली आहे. त्याशिवाय समितीने सध्या गाजत असलेल्या ‘घुमर’ या गाण्यातही काही बदल सुचवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी नमते घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आलेले हे अडथळे पाहता येत्या काळात ‘पद्मावती’त कोणते बदल करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातील २६ दृश्यांवर सेन्सॉरने कात्री लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तेव्हा आता पुन्हा एकदा ‘पद्मावती’च्याच चर्चा सर्वत्र रंगल्या असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जाणकारांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …