Breaking News
Home / ठळक बातम्या / VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

पिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. चांदूरबाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली.

तिरमारे यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत संबंधित यंत्रणेकडून त्या संदर्भातील माहिती मिळवली असता, त्यातून हा प्रकार उघडकीस आल्याचा त्यांनी दावा केला आहे. बच्चू कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास महामंडळ म्हणजेच (म्हाडा) या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्याचा ताबा आमदार बच्चू कडू यांनी घेतला.

अचलपूर मतदार संघातून विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथील मालमत्ते संदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात आज अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरं उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं होत, परंतु कर्जाची परतफेड करू न शकल्याने हे घर चार महिन्यांआधीच विकण्यात आले आहे. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेला आरोप खोटा आहे, असे आ. बच्चू कडू यांनी सांगितले.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …